वन विभागाच्या क्षेत्रातून राहुल गांधींचा मोटारीने प्रवास राहणार , ‘भारत जोडो’ यात्रा १६ व १७ नोव्हेंबरला अकोला जिल्ह्यात

वन विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या मार्गावरील काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा ‘भारत जोडो’ यात्रेतील प्रवास मोटारीने (कार) राहणार आहे.नियमभंग होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली जात आहे. वाशीम जिल्ह्यातील मेडशी ते पातूरपर्यंतच्या वन विभागाच्या क्षेत्रातून राहुल गांधी मोटारीने प्रवास करून १६ नोव्हेंबरला सायंकाळी पातूर येथे दाखल होतील. यात्रेचा जिल्ह्यातून ४५ कि.मी. चा प्रवास पूर्ण होईल. यात्रेदरम्यान खा. गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, कामगारांसह १६ संघटनांचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. लोकशाहीच्या रक्षणासाठी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस नेत्यांनी केले.

पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन व माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी संबोधित केले. यात्रेचे समन्वयक प्रशांत गावंडे, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके यांनीही यात्रेची माहिती दिली. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, व्यापारी, शेतमजुरांसमोर प्रचंड आव्हाने असताना पंतप्रधान उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहेत. नागरिक अस्वस्थ असून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राहुल गांधी यांची ३५०० कि.मी.ची भारत जोडो पदयात्रा देशभर सुरू आहे. ही यात्रा इतिहास घडवेल, असा विश्वास प्रा. हुसेन यांनी व्यक्त केला. भारत एकसंघपणे पुन्हा जोडल्या जावा, हा देश अखंड राहावा असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी केले.

यात्रेचा १६ नोव्हेंबर रोजी रात्री पातूर तालुक्यात मुक्काम राहील. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी पातूर येथील शाह बाबू हायस्कूल येथून यात्रा बाळापूरकडे रवाना होईल. दुपारी ३.३० वाजता हिंगणा उजाडे व त्यानंतर बटवाडी फाटा येथे मुक्काम राहणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी यात्रा कुपटा येथील जि.प. शाळेतून बुलढाणा जिल्ह्यात रवाना होणार आहे. खा. राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ईपीएस ९५ पेन्शनधारक समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्यार्थी संघटना, एकल महिला संघटना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसह अन्य संघटनांचे प्रस्ताव आलेले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती व संघटनांचाही प्रस्ताव येत आहेत. यात्रेत मेधा पाटकर यांच्या चमूतून ५०० महिला यात्रेत सहभागी होणार आहेत. शेगाव येथे १८ नोव्हेंबरला खा. राहुल गांधी यांची सभा होईल. या सभेत पाच लाख नागरिक उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply