लोणी काळभोर : अप्पर तहसील कार्यालयाचे नागरिकांकडून स्वागत

लोणी काळभोर : पूर्व हवेलीसाठी लोणी काळभोर येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयाचे नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन, लोणी कंदसह पूर्व हवेलीतील ४० हून अधिक गावातील नागरिकांची महसुली कामे लोणी काळभोर येथील महसुली कार्यालयातून होणार असल्याने पूर्व हवेलीमधून विविध गावचे सरपंच, संघटना यांनी वरील निर्णयाचे स्वागत केले आहे. हवेली तालुक्याची लोकसंख्या व अधिकाऱ्यांच्यावर असलेला कामाचा बोजा लक्षात घेता लोणी काळभोर, उरुळी कांचन, लोणी कंदसह पूर्व हवेलीसाठी लवकरच स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरु होणार असल्याची माहिती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (ता.१४ ) विधानसभेत दिली. या निर्णयाचे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, पेठ, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह इतर ग्रामपंचायतीच्या सरपंचानी व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. हवेली तालुक्याची लोकसंख्या व अधिकाऱ्यांच्यावर असलेला कामाचा बोजा लक्षात घेता शिरूर-हवेलीचे आमदार अँड. अशोक पवार यांनी विधानसभेत पूर्व हवेलीसाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी केली होती. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाला हिरवा कंदील देत लवकरच सुरु करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, हवेली तहसिल कार्यालयात दैनंदीन कामकाज संदर्भात दर महिन्याला साधारणत: ७ ते ८ हजार विविध अर्ज प्राप्त होतात. तर शिक्षा पत्रिका मिळणेसाठी दरमहा साधारणत: ४०० ते ५०० प्राप्त होतात. हवेली तहसिल कार्यालय नागरीक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत: ६००० दाखले दिले जातात. वाढती लोकसंख्या नागरीकरण, शहरीकरण इ. बाबी विचारात घेता परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. कोट : हवेली तालुक्याची लोकसंख्या ही एका जिल्ह्याच्या लोकसंख्येएवढी असल्या कारणाने तहसील विभागाशी संबंधित असलेली कामे खूप दिरंगाईने होत होती. त्यामुळे प्रशासनावर खूप ताण येत होता. शेतकऱ्यांची व सर्व नागरिकांची गैरसोय होत होती. परंतु वरील निर्णयाने पूर्व हवेलीत स्वतंत्र कार्यालय होणार असल्याने महसूल विभागाशी संबंधित असलेली कामे आणखी जलद गतीने होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे खूप खूप आभार व आमदार अशोक पवार यांचे अभिनंदन. दिलीप वाल्हेकर, अध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हवेली तालुका हा एका जिल्ह्याप्रमाणे आहे. ५० लक्ष लोकसंख्या व ८० कोटीपेक्षा जास्त महसूल देणाऱ्या तालुक्यात एक अप्पर तहसील कार्यालय हवेच होते. लोणी काळभोर हद्दीत शासकीय जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने जागेची अडचण येणार नाही. आमदार अशोक पवार यांनी स्वतंत्र अप्पर तहसील मंजूर करून घेतल्याबद्दल त्यांचे लोणी काळभोरतर्फे हार्दिक अभिनंदन तसेच आमदार पवार हे नेहमीच पूर्व हवेलीला झुकते माप देत असतात. त्यांनी केलेल्या कामाचे लोणी काळभोरसह परिसरात विशेष कौतुक केले जात आहे. माधुरी काळभोर, सरपंच, लोणी काळभोर, (ता. हवेली) अप्पर तहसील कार्यालय उरुळी कांचनला झाले तर त्यासाठी आवश्यक असलेली जागा ग्रामपंचायतीतर्फे उपलब्ध करून देऊ, पूर्व हवेलीतील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उरुळी कांचनची ओळख आहे. उरुळी कांचनला १५ ते २० गावे जोडून आहेत. त्यामुळे गावाचा महसूल मोठ्या प्रमानात आहे. आमदारांनी पाठपुरावा करून तहसील कार्यालय केले त्याचे आम्ही स्वागत करतो. गावच्या वतीनेहि आमदारांचे स्वागत करतो. राजेंद्र बबन कांचन, सरपंच, उरुळी कांचन, (ता. हवेली) शेतकऱ्यांना सातबारा व ८ अ मध्ये असलेल्या छोट्या-छोट्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुणे या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे तहसील कार्यालय पूर्व हवेलीत झाले तर त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त म्हणजे वेळ वाचणार आहे. हवेली तालुका सर्वात मोठा असल्याने कामाचे विभाजन झाल्याने कामे लवकर होतील. त्यामुळे गावच्या वतीने आमदारांच्या निर्णयाचे स्वागत करतो. सुरज चौधरी, सरपंच, पेठ, (ता. हवेली)


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply