लोणावळ्यात पर्यटनस्थळी पाच नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी

लोणावळ्यातील पर्यटनस्थळी सायंकाळी पाच नंतर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे लोणावळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितलं. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतंच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.  

लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेले डोंगर धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. हिरवागार परिसर, धबधबे, रिमझिम पाऊस याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. ही संख्या विकेंडला लाखोंच्या घरात देखील जाते. यामुळं शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते. मागच्या रविवारी टायगर पॉईंट ते सहारा ब्रिज या 10 ते 12 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कासवगतीने सुरू होती. त्यामुळं सायंकाळी पाच नंतर लोणावळा पोलिसांनी पर्यटकांना मज्जाव केला आहे. पर्यटकांनी अतिउत्साह दाखवून धोकादायक ठिकाणी जाऊ नये, स्वतः चा जीव धोक्यात घालू नये, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी पर्यटकांना केलं आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply