लेकीच्या लग्नासाठी पैसे नाही, शेतकरी बापाने घेतला टोकाचा निर्णय, थेट मृतदेहच घरी आला

आपल्या मुलीच्या लग्नासाठी प्रत्येक बाप पै-पै जमवत असतो. लेकीचे लग्न धुमधडाक्यात व्हावं, लग्नात कोणताही अडथळा येऊ नये असं प्रत्येक बापाला वाटत असतं. मात्र आता वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लेकीच्या लग्नाचा बस्ता खरेदीसाठी पैसे नसल्याने चिंतेत असलेल्या एखा शेतकरी बापाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या वेदनादायक बातमीने पांगरी नवघरे परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने राजू कालापाड यांनी जीवन संपवलं

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजू कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीये. राजू कालापाड यांच्या मुलीचं लग्न 14 मार्च होणार होतं. आज लग्न बस्त्याची खरेदी होणार होती, मात्र पैश्याची जुळवा जुळव नं झाल्यानं आर्थिक विवंचनेतून राजू कालापाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

गळफास घेत आत्महत्या

राजू कालापाड यांच्याकडे अवघी एक एकर शेती आहे. गेल्या काही वर्षात अपेक्षित उत्पन्न शेतात न झाल्यामुळे त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढला होता. हे कर्ज फेडण्यासाठी राजू पत्नीसह पुण्यात मोलमजुरी साठी गेले होते. मोलमजूरी करून मुलीच्या लग्नासाठी काही दिवसांपासून ते गावी आले होते. लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. बस्ता खरेदीचा दिवस असल्याने नातेवाईकही घरी जमले होते. मात्र पैसांची जुळवाजुळव न झाल्याने राजू यांनी आज सकाळी शेतात जाऊन झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

परिसरावर शोककळा

राजू यांना एक मुलगी आणि दोन लहान मुलं आहेत. अवघ्या एका महिन्यावर मुलीचे लग्न आले होते. त्या पूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्यानं गावकर्‍यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना पित्याचा मृतदेह घरी आल्याने मुलीसह नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, याआधीही अनेक गरीब शेतकऱ्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *