लंडन : राणी एलिझाबेथ कालवश ; ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात

लंडन : इतिहासात ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घ काळ विराजमान असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वृद्धापकालाने निधन झाले. वयाच्या ९६व्या वर्षी स्कॉटलंडमधील बाल्मोरल येथील प्रासादात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्कॉटलंडमधील सुटीकालीन प्रासादामध्ये आराम करण्यासाठी गेल्या असताना एलिझाबेथ यांची प्रकृती खालावली. याबाबत माहिती मिळताच राजघराण्याच्या सर्व सदस्यांनी स्कॉटलंडकडे धाव घेतली.  एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर बसतील. ते गुरूवारची रात्र स्कॉटलंडमध्येच राहणार असून शुक्रवारी लंडनला परतणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एलिझाबेथ यांचे नातू राजपुत्र विल्यम्स आणि हॅरीदेखील स्कॉटलंडमध्ये दाखल झाले. 

७० वर्षांची कारकीर्द

दुसऱ्या महायुद्धानंतर १९५२ साली राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला. तब्बल ७० वर्षे त्यांनी देशाचे नेतृत्व केले. या काळात एलिझाबेथ यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे पाहिली. राष्ट्रकूल महासत्तेचा अस्त, शीतयुद्ध, युरोपियन महासंघात  ब्रिटनचा प्रवेश आणि निर्गमन अशा अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार होत्या.

१५ पंतप्रधानांची नियुक्ती..

आपल्या कारकीर्दीत एलिझाबेथ यांनी तब्बल १५ पंतप्रधान बघितले. १८७४ साली जन्मलेल्या विस्टन चर्चिल यांच्यापासून ते १०१ वर्षांनी जन्मलेल्या लिझ ट्रस यांची नियुक्ती एलिझाबेथ यांनीच केली.

एक होती राणी..

किंग जॉर्ज सहाव्या यांच्या मृत्यूनंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी राणी एलिझाबेथ  राष्ट्रकूल देशांची राणी बनली. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आल्याने जराही न डगमगता आल्या प्रसंगाला ताठ मानेने राणी सामोरी गेली. १९५३ साली राणीच्या राज्याभिषेकाचे टीव्हीवरून प्रथमच प्रसारण करण्यात आले. किंबहुना या प्रसंगाचे औचित्य साधून अनेकांनी घरी टीव्ही विकत घेतले.  दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक मंदीमधून जाणाऱ्या इंग्लंडवर राज्य करताना राणीने बरेच चढ-उतार बघितले. हळूहळू इंग्लंडने औद्योगिकतेबरोबर ज्ञान-विज्ञान आणि बँकिंग क्षेत्रात मोलाची प्रगती केली. ८० च्या दशकापासून इंग्लंडमधील राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक स्थित्यंतरे राणीने जवळून पाहिली



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply