मुंबई : राष्ट्रवादीतर्फे खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी ; रामराजे निंबाळकर यांना तिसऱ्यांदा संधी

मुंबई : भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांची आमदार होण्याची प्रतीक्षा संपली आहे. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. तर, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे.

भाजपची सत्ता असताना मंत्रिपद सोडावे लागल्यापासून ते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर अस्वस्थ एकनाथ खडसे अन्य राजकीय पर्यायाच्या शोधात होते. अखेर भाजपच्या राज्य नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काही अवधीतच राज्यपालनियुक्त १२ विधान परिषद सदस्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. परंतु दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला, परंतु राज्यपालांनी त्याला मान्यताच दिली नाही. त्यामुळे विधिमंडळातील प्रवेशासाठी खडसेंना प्रतीक्षा करावी लागली. अखेर विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीने खडसे यांना उमेदवारी देऊन त्यांची प्रतीक्षा संपुष्टात आणली.

२००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे पक्षाने त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली. त्यांना पक्षाने आता तिसऱ्यांदा संधी दिली. सभापतीपदी बहुधा निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी खडसे व निंबाळकर यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ पाहता, दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात.

राष्ट्रवादीने दोन्ही जुन्याजाणत्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने पक्षात काहीशी अस्वस्थता आहे. तरुणांना पक्षात कधी संधी मिळणार अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply