राज्यात उष्णतेची लाट… मार्चमध्येच उन्हाचा कडाका वाढला!

पुणे : राज्यात ठिकठिकाणच्या तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. कोकणातील रत्नागिरी व विदर्भात अकोला येथे सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात आज ३८ अंश सेल्सिअस तापमानात होते. तेथे २१ मार्चपर्यंत ४४ अंशांपर्यंत तापमान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.राज्याच्या कमाल तापमानात वाढ होणार असून, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसानंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे. बुधवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कमाल तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होणार असून, काही ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कोकणासह, गुजरात, पश्चिम राजस्थान, कर्नाटक किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरीसह, डहाणू, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा ३७ अंशांपार गेल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. विदर्भात उन्हाचे चटके वाढले नागपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, दिवसागणिक तापमानात वाढ होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने सौम्य लाटेचा इशारा दिल्याने या आठवड्यात पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजस्थान व गुजरातसह अन्य राज्यांतील लाटसदृश वातावरणामुळे विदर्भात सध्या उन्हाची सौम्य लाट पसरली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत नागपूरचे कमाल तापमान ३७.२ अंशांवर गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील नागपूरचे हे सर्वाधिक तापमान ठरले. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे ३९ अंश सेल्सिअस इतकी झाली. जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली असून, सोमवारी (ता. १४) कमाल तापमान ३८ अंश नोंदविले गेले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply