राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; मुंबई-औरंगाबादेत जोरदार निदर्शनं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भगत सिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध जोरदार आंदोलन केले आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे कोश्यारींचा निषेध करण्यात आला. तर, औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात रास्ता रोको करण्यात आला. 

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे कोश्यारिंचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, काल राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार काढले. अनेकवेळा असे उदगार काढले जातायत.

आम्हाला सांगावे लागेल कि देशात नाही तर जगात महाराजांचा आदर केला जातो. शिवाजी महाराजांच नाव घेऊन सत्तेत आहेत. ज्या पद्धतीने व्यक्तव्यं केले जातायत म्हणून आम्ही निषेध करतोय. असे राज्यपाल आम्हाला नकोत, त्यांना हवे असेल तर त्यांच्या राज्यात जावे. आमची केंद्राकडे मागणी आहे कि त्यांना महाराष्ट्रातून त्यांची हकालपट्टी करावी. अशी वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.

जर एक दोन दिवसात त्यांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही राजभवनावर आंदोलन करू. शिवप्रताप दिनी जसं अनधिकृतपणे बांधकाम पाडलं, तस यांना देखील बाहेर पाठवावं लागेल. जर बाहेर काढलं नाही तर समुद्रात होणारे शिवस्मारक आम्ही मराठे राजभवनावर करू, एवढे मराठे खंबीर आहेत त्यामुळे राज्यपालांची हकालपट्टी करु असं ते म्हणाले आहेत.

राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. शहरातील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून कार्यकर्ते वाहनांसमोर झोपले. राज्यपालांचा प्रतिकात्मक पुतळा तसेच टोपी जाळून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर झटापट झाली, त्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान या आंदोलनात विधान परिषदेचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे देखील आंदोलनात सहभागी झाले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात अंबादास दानवे सहभागी झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्यासह मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनामुळे काही काळ क्रांती चौकात तणावाचे वातावरण होते. सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, शिवाजी महाराजांसाठी कितीही वेळा अटक झाली तरी चालेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply