मोठी बातमी! आता शहीद जवानाची बहीण-मुलींनाही मिळणार अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी; लष्करात विचार सुरू

Indian Army News : शहीद जवानाची बहीण आणि मुलींनाही आता अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी (Indian Army Job) मिळू शकणार आहे. लष्करात सुरू असलेल्या सुधारणांच्या कामात हा पुढाकार घेतला जात आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या शिफारशीनंतर सरकार यावर गांभीर्यानं विचार करत आहे. समितीनं ) अशी नियुक्ती लिंगभेद न करता करण्याची शिफारस केली होती. त्यात म्हटलंय, शहीद जवानाचा मुलगा, भाऊ अथवा मुलगी आणि बहिणीला अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी दिली जावी, असं नमूद केलंय.

सध्याच्या नियमांनुसार, 'जेसीओ (JCO) किंवा कोणत्याही दर्जाचा जवान युद्धात मारला गेला तर लष्कर त्याच्या एका मुलाला ताबडतोब सैन्यात नियुक्त करतं. पण, कन्येची नियुक्ती करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध नाहीये. जर शहीद जवान अविवाहित असेल, तर त्याच्या भावाला ही संधी दिली जाते, पण बहिणीला पर्याय नाही.'

याशिवाय, जर शहीद जवान विवाहित असेल. परंतु, त्याला मूल नसेल किंवा मुलगा नसेल, तो अल्पवयीन असेल तर त्याच्या सख्या भावाला ही संधी दिली जाते. परंतु, त्यानं शहिदाच्या विधवा पत्नीशी लग्न करावं अशी अट आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीनं या मुद्द्यावर बराच विचार केल्यानंतर नुकताच आपला अहवाल सरकारला सादर केलाय.

सध्याच्या नियमांमुळं या योजनेचा लाभ सर्व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळत नाही. नौदलानं समितीला सांगितलं की, 2014 पासून शहिदांच्या नातेवाईकांना 35 नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. 2016 पासून हवाई दलानं एकूण 30 नियुक्त्या दिल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडं कोणतीही आकडेवारी नसल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं. यावर समितीनं आश्चर्य व्यक्त केलंय.

ही शिफारस महत्त्वाची आहे. खरं तर हे नियम खूप जुने आहेत. तेव्हा सैन्यात महिलांची भरती होत नव्हती. आज तिन्ही सैन्यात महिला सैनिक आहेत, त्यामुळं या शिफारशीचा गांभीर्यानं विचार केला जात आहे. लष्करात महिला सैनिकांची लष्करी पोलीस म्हणून भरती केली जात आहे. दुसरीकडं हवाई आणि नौदलातील महिला जवानांसाठी यावर्षीपासूनच प्रवेश खुला करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply