मुसळधारांच्या तडाख्यात ; राज्यातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू ; कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कायम

पुणे : नैर्ऋत्य मोसमी पावसाने अखेर शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) राज्याच्या उत्तरेकडून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र, परतीच्या सुरुवातीने राज्याच्या इतर भागांना मुसळधारांचा तडाखा दिला. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मुंबई परिसरासह कोकण विभाग आणि मराठवाड्यात काही भागांत जोरदार पाऊस झाला. पावसासाठी राज्यात पोषक वातावरण असल्याने मोसमी वारे परतताना राज्यात आणखी काही दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता कायम आहे. पीक हाताशी आलेला शेतकरी त्यामुळे धास्तावला असून, नागरिकही आता पावसाने हैराण झाले आहेत.

राजस्थानमधून २० सप्टेंबरला मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला होता. सध्या उत्तरेकडील बहुतांश भागांत कोरड्या हवामानाची स्थिती आहे. परतीचा प्रवास सुरू झाल्यापासून २४ दिवसांनंतर मोसमी पावसाने महाराष्ट्रातून माघारीला सुरुवात केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि जळगावच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी गेल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन दिवस उशिराने राज्यातून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पाऊस माघारी गेल्याचा भाग वगळून उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा धुमाकूळ कायम आहे. शुक्रवारी पुण्यात हंगामातील सर्वाधिक सुमारे ७५ मिलिमीटर पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील नगर, महाबळेश्वर, सांगली आदी भागांतही मोठ्या पावसाची नोंद झाली. मुंबई परिसरासह कोकण विभागामध्येही पावसाची हजेरी होती. मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस परभणी येथे पडला.

बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्राकार वारे आहेत. ही प्रणाली दक्षिणेकडे येत आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंतही वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. परिणामी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील भागांत पावसाचे प्रमाण अधिक असून, त्याच प्रणालीमुळे राज्याच्या काही भागांत सध्या मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी (१५ ऑक्टोबर) कोकण आणि मध्य महाहराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

पावसाचा अंदाज कोणत्या जिल्ह्यांत

कोकण विभागातील मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर आदी जिल्ह्यांत १६-१७ ऑक्टोबर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यांतही १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी राहणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply