मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडला ‘वर्षा’ बंगला, चौका-चौकात प्रचंड घोषणाबाजी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वीच आपलं शासकीय निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला सोडला आहे. त्यांनी आपला मुक्काम ‘मातोश्री’वर हलवला आहे. काही वेळापूर्वी त्यांनी फेसबूक लाइव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधला होता. यावेळीच त्यानी आपण आजच वर्षा बंगला सोडणार असल्याचं सांगितलं होतं.

त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला सोडला आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावरून मातोश्रीकडे जाताना चौका-चौकात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण रस्त्यावर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली आहे. वर्षा बंगल्याबाहेर अनेक महिला कार्यकर्त्या देखील जमा झाल्या होत्या. हा बंगला सोडण्यापूर्वी कार्यकर्त्ये भावनिक झाले, तर काही महिलांना अश्रूही अनावर झाले होते. मातोश्रीकडे जाताना उद्धव ठाकरे यांनी जागोजागी गाडी थांबवून शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत.

दुसरीकडे, मातोश्री बाहेर देखील हजारो शिवसैनिक आणि पदाधिकांऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरे पायी चालत आपल्या घराकडे गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. अनेक आमदार सोडून गेल्यानंतर सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असंच काहीसं हे चित्र मातोश्रीबाहेर पाहायला मिळालं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply