मुंबई : तुम्ही 24 तासांच्या आत मुंबईत या, आम्ही 'मविआ'तून..., राऊतांचं शिंदे गटाला आवाहन

मुंबई : शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंड केलं आहे. या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. शिवसेनेकडून या बंडखोर आमदारांना माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील अजूनही 21 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 

इतकंच नाही तर, आमदारांनी 24 तासांच्या आत मुंबईत यावं, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू असं आवाहन संजय राऊत यांनी शिंदे गटाला केलं आहे. "तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल", असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

"मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडा, तुमच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे नक्की विचार करतील, फक्त पुढच्या २४ तासांत मुंबईत या", असा मेसेज संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.

भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. शिवसेनेसोबत एकुण २३ आमदार असल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला. फ्लोअर टेस्टवेळी कोण कोणासोबत आहे, हे समोर येईल असंही संजय राऊत म्हणाले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply