मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात अडथळा ठरणारी ५५ अनधिकृत बांधकामे तोडली; मुंबई महानगरपालिकेची भांडुपमध्ये मोठी कारवाई

मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात अडथळा बनलेली भांडुप येथील ५५ अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे प्रकल्पातील अडथळा दूर झाला असून प्रकल्पाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. ही अनिधकृत बांधकामे हटविण्यात आल्याने रस्त्याची रुंदी १५ मीटरने वाढली आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता (गोरेगांव – मुलुंड लिंक रोड) हा मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. सुमारे १२.२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग बहुतांशी विभागातून जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे असून ती टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भांडुप येथील सुदर्शन हॉटेल ते तुळशेतपाडा या सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या परिसरातील ५५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. कारवाईपूर्वी  या भागातील रस्त्याची रुंदी सुमारे ३० मीटर इतकी होती, तर आता कारवाईनंतर ती ४५.७५ मीटर इतकी झाली आहे.

महानगरपालिकेच्या ‘एस’ विभाग कार्यालयाने केलेल्या कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या भागाचा ताबा मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याकडे देण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी  दिली. या कारवाईसाठी २ जेसीबींसह आवश्यक त्या यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला. या कारवाईत कार्यकारी अभियंता भास्कर कसगीकर, दुय्यम अभियंता सचिन डाऊर, सहाय्यक अभियंता  राहुल जाधव, दुय्यम अभियंता (रस्ते) कल्पना कोतवाल यांच्यासह २५ कामगार – कर्मचारी – अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले होते. हटविण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांच्या जागेवर उड्डाणपूल प्रस्तावित असल्याने सदर परिसराचा ताबा मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याकडे देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply