मुंबईत ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमने-सामने; विकासकामाच्या श्रेयवादावरून जोरदार घोषणाबाजी

अलीकडेच ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथे ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला होता. या वादात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यासमोरच ही मारहाण झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. ही घटना ताजी असताना असताना आता मुंबईतील प्रभादेवी येथील विकासकामाच्या श्रेयवादावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत.

मुंबईतील प्रभादेवी परिसरातील रस्त्याचं आणि पदपथाच्या कामावरून दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या कार्यकाळात संबंधित कामाला सुरुवात झाली होती, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे या कामाचं उद्घाटन समाधान सरवणकर यांच्या हस्ते करण्यात येत होतं. पण यावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

संबंधित काम ठाकरे गटाचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावेळी घटनास्थळी ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळासाठी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी थांबवली आहे. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply