महिला मालमत्ताधारकांसाठी सामान्य करात ५० टक्के सवलत कायम ठेवण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींसाठी देण्यात येणारी सामान्य करातील ५० टक्के सवलत यापुढे कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गेल्या दहा वर्षात या सवलतीचा लाभ शहरातील जवळपास ३४ हजार महिलांनी घेतला आहे.

पालिकेकडून २०११-१२ पासून अशाप्रकारे महिलांच्या मिळकतींना ५० टक्के सवलत देण्यास सुरूवात झाली. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी अर्ज करावा लागतो. तसेच, सवलतीचा लाभ घेताना महिलांना इतर कुठल्याही मालमत्ताकरात सवलत मिळत नसल्याचे प्रतिज्ञापत्र व अर्ज सादर करावा लागत होते. या वर्षीपासून ही कार्यपध्दती बदलण्यात आली आहे. जुन्या ज्या मिळकतींना सामान्यकरात ५० टक्के सवलत लागू केली होती. ती सवलत २०२२–२३ मध्ये कायम ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

महापालिकेकडे एकूण ५ लाख ७१ हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद आहे. मिळकतकरासाठी पालिकेच्या वतीने विविध सवलती दिल्या जातात. निवासी मिळकत महिलेच्या नावाने असल्यास सामान्यकरात ५० टक्के सवलत दिली जाते, त्याचा लाभ गेल्या वर्षात एकूण ७ हजार ९९२ महिलांनी तर आतापर्यंत एकूण ३४ हजार महिलांनी लाभ घेतला आहे. शहरातील घर, बंगला किंवा सदनिका नावावर असलेल्या महिलांनी विभागीय करसंकलन कार्यालयात त्याची नोंदणी करून घेतल्यास सवलतीचा लाभ दिला जातो.

याशिवाय, माजी सैनिकांच्या मिळकती सवलतीचा लाभ १ हजार ९१२ मिळकतधारकांनी घेतला आहे. ती एकूण सवलत १ कोटी ४१ लाख आहे. ऑनलाइन भरणा केल्यास मिळणाऱ्या ५ ते १० टक्के सवलतीचा लाभ तब्बल १ लाख ५३ हजार २०६ मिळकतधारकांनी घेतला आहे. ही एकूण रक्कम १२ कोटी ७४ लाख इतकी होते.

शौर्यपदकधारकांच्या मिळकतींनाही सूट –

शौर्यपदकधारकांच्या मिळकतींनाही सूट दिली जाते. शहरातील अशा एकूण ७ मिळकतींना १ लाखाची सूट देण्यात आली आहे. ३७ हजार ५०८ मिळकतधारकांनी मुदतीपूर्वी देयके भरून एकूण १ कोटी ५५ लाखांची सवलत मिळवली आहे. दिव्यांगांच्या नावे मिळकत असल्यास मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मागील वर्षी ५९१ जणांनी घेतला आहे.

अशा आहेत सवलतीच्या योजना –

-स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची पत्नी स्वत: रहात असलेल्या एका निवासी घरास – ५० टक्के सवलत -फक्त महिलांचे नाव असलेल्या, स्वत: रहात असलेल्या एका निवासी घरास – ५० टक्के सवलत -दिव्यांगत्वाचे प्रमाण ४०% किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस – ५० टक्के सवलत -संपूर्ण मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरणाऱ्यांसाठी – १० टक्के सवलत. बिगरनिवासी, मिश्र,औद्योगिक, मोकळ्या जमिनी आदी मालमत्तेस – ५ टक्के सवलत -संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवा तसेच अविवाहीत शहीद सैनिकांच्या तसेच शहरात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ताकरात (सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणी पुरवठा लाभ कर, रस्ता करात) १०० टक्के सवलत -प्रामाणिकपणे दरवर्षी मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चौथ्या वर्षी संपूर्ण वर्षासाठी २ टक्के सवलत

दोन लाख रहिवाशांना विविध करसवलतींचा लाभ –

पिंपरी पालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध करसवलतींचा गेल्या २०२१- २२ या आर्थिक वर्षांत २ लाखांहून अधिक मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे. त्यांना एकूण १७ कोटी ८६ लाखांची सवलत पालिकेने दिली आहे. या करदात्यांकडून पालिकेला २५२ कोटींचा भरणा झालेला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply