महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटणार? आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक; अमित शहा काय तोडगा काढणार?

Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आज दिल्लीत बैठकीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित राहणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीचा महाराष्ट्रातून तीव्र निषेध करण्यात आला होता. या दगडफेकीला प्रत्त्युतर म्हणून कर्नाटकातील काही बसेसना महाराष्ट्रात काळं फासण्यात आलं होतं.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुरापती काढत असताना शिंदे -फडणवीस सरकारने कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नाही, असा आरोप करीत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आक्रमक रूप धारण करीत मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह राज्यातला सरकारला लक्ष्य केले.

मुख्यमंत्री बोम्मई आक्रमक विधाने करीत असताना शिंदे-फडणवीस सरकार इतके थंड कसे, असा सवाल विरोधी पक्ष करीत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावादावर तोडगा काढण्याचं आश्वासन महाविकासआघाडीच्या खासदारांना दिलं होतं.

दरम्यान, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत चर्चेसाठी बोलावलं आहे. या चर्चेत अमित शहा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काय तोडगा काढणार? याकडेचं सर्वांचंच लक्ष लागून आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply