मणिपूरमध्ये भीषण भूस्खलन; १८ जवानांसह २४ नागरिक ठार तर ३८ जण बेपत्ता

इंफाळ, मणिपूर: मणिपूर राज्यातल्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भंयंकर भूस्खलन झाले. यात शनिवारपर्यंत मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या १८ जवानांचा समावेश आहे. पीटीआयने गुवाहाटीतील लष्करी प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, अद्याप ३८ लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणखी काही पथके तैनात करण्यात आली आहेत. लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये घटनास्थळाजवळ आणखी एक भूस्खलन झाले आहे. 

प्रवक्त्याने सांगितले की, या अपघातात प्राण गमावलेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जूनियर कमीशंड ऑफिसर - जेसीओ) देखील आहे. हवाई दलाची दोन विमाने आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे जेसीओसह १४ जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत. एका जवानाचा मृतदेह रस्तेमार्गाने मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात पाठवला जाणार आहे. तसेच त्यांनी सांगितले की, जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यापूर्वी त्यांना इंफाळमध्ये पूर्ण सन्मानाने लष्करी निरोप देण्यात आला.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनीही शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. मणिपूरच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्टेशनजवळील भारतीय लष्कराच्या १०७ टेरिटोरियल आर्मी कॅम्पजवळ बुधवार-गुरुवारी रात्री हे भूस्खलन झाले. येथे जिरीबाम ते इंफाळ दरम्यान रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. हे सैनिक त्याच्या संरक्षणासाठी तैनात होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply