बुलढाण्यात शिवसेना व शिंदेगटात तुफान राडा; पोलिसांसमोरच धक्काबुक्की, हाणामारी

आजपर्यंत एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेल्या शिवसेना आणि शिंदेगटातील वादाचे आज जहाल संघर्षात रुपांतर झाले. आज बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यात सेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. यासंदर्भात अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणाऱ्या शिंदेगटातील सैनिकांनी पोबारा केला.

आमचे कार्यकर्ते आग्यामोहोळ, जिल्ह्यात फिरू देणार नाही – गायकवाड

शेतकऱ्यांची संस्था असलेल्या बाजार समितीत एकतर राजकीय कार्यक्रम घेतला आणि त्यात आमच्या नेत्यांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. आजची घटना म्हणजे त्याची संतप्त प्रतिक्रिया होय. आमचे कार्यकर्ते आग्यामोहोळ आहेत. यापुढे आमच्या नेत्यांबद्धल गलिच्छ विधाने केल्यास जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला.अनेक दिवसांपासून सेनेचे नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रेसह अन्य पदाधिकारी आमचे नेते मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह बद्दल अर्वाच्य भाषा वापरत आहेत. त्यांना समजून सांगितल्यावरही बदल झाला नाही. आजच्या ‘ लाईव्ह’ कार्यक्रमातही हेच घडले. यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. यापुढे अशी भाषा वापरणे बंद केले नाही तर काय होईल ते पाहून घ्या, असेही गायकवाडांनी बजावले.

हल्ला होऊनही आम्ही संयम बाळगला, अन्यथा अनर्थ झाला असता. मी शिवसैनिकाना , संयम बाळगण्याचे आवाहन केले, शांत ठेवले. अन्यथा हल्लेखोर केवळ दहाबारा आणि कार्यक्रमाला तीनएकशे सैनिक हजर होते, अशा सुचक शब्दात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी आपली भूमिका मांडली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply