बीड : सततच्या नापिकीने शेतकरी हवालदील; नैराश्यात राहत्या घरी केली आत्महत्या

बीड : बाजारात अन्नधान्याच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. मात्र तरी याचा योग्य मोबदला शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. बीड जिल्ह्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. अशात काल देखील सततच्या नापिकीला कंटाळून ५६ वर्षीय एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेतला. नापीक आणि कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दुख:चा मोठा डोंगर कोसळला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, बीडच्या चिंचोलीमाळी येथे ही घटना घडली आहे. यात सुभाष भागोजी राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल रात्री त्यांनी संपूर्ण कुटुंबाबरोबर जेवण केले. १२ नंतर सर्व झोपलेले असताना त्यांनी स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रात्री त्यांनी घराच्या स्लॅबला असलेल्या हुकात रशी टाकून गळफास लावून घेतला.

सकाळी त्यांच्या पत्नीला जाग आली तेव्हा पतीला पाहून त्यांना मोठा धक्का बसला. गावात ही घटना वाऱ्याच्या वेगाने पसरली. सुभाष राऊत यांच्याकडे फक्त २ एकर २५ गुंठे एवढी जमीन होती. यात पिकलेल्या धान्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. जमिनीत कोणतेही पीक हवे तसे येत नसल्याने त्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. गावात उसने पैसे तसेच डोक्यावर मोठे कर्ज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सदर घटनेत केज पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply