“बाळासाहेबांच्या विचारांवरच आमची वाटचाल…” धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे?

आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. तसंच त्यांनी योग्य निर्णय घेतला आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही बंड केलं होतं त्यानंतर कायदेशीर लढाईही लढली. आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळी कागदपत्रं सादर केली होती. त्यानंतर हा निर्णय आला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

निवडणूक आयोगान एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आजच्या दिवसांपर्यंत शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना बघण्यास मिळाला. त्यानंतर आता हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं आहे?

आम्ही जी कागदपत्रं सादर केली होती त्यानंतर धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव आम्हाला मिळालं आहे. आम्ही नियमबाह्य काहीही केलेलं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय्य निर्णय दिला आहे. आज सत्याचा विजय झाला आहे. या निकालाने आम्हाला न्याय मिळाला आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

उदय सामंत यांनी काय म्हटलं आहे?

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना ही आमच्याकडे आली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आज विजय झाला असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply