पुणे : बनावट गुंठेवारी प्रकरणी पुणे , पिंपरी महापालिकेची फसवणूक उघडकीस ; १९ जणांविरोधात गुन्हे

पुणे : हडपसर येथील मेगा सेंटरमधील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना दलालांमार्फत बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त नोंदणी केल्या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट गुंठेवारी, बनावट अकृषिक दाखले (एन ए) जोडून फसवणूक केल्या प्रकरणी १९ जणांच्या विरोधात पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकारामुळे खासगी दलालांनी राज्य शासनासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या बांधकाम विभागाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी तपासासाठी विशेष पथक कार्यान्वित केले जाणार आहे. याबाबत विष्णु तुकाराम आमले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदा नामदेव निंबाळकर, अमोल नामदेव निंबाळकर, अजित नामदेव निंबाळकर, सोनाली अतुल निंबाळकर आणि महेश ओमप्रकाश धुत (रा. लेकटाऊन सोसायटी, कात्रज ) तसेच त्यांना बेकायदा कामासाठी मदत करणाऱ्या दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरव्यवहारात आणखी काही आरोपी सामील असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात शासकीय कर्मचारी सामील आहेत किंवा कसे याबाबतही तपास करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या हडपसर कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या दस्तास जोडण्यात आलेल्या कागदपत्रांच्या सत्यता, वैधता कायदेशीर बाबींसाठी तसेच खोटे आढळल्यास नोंदणी अधिनियमाचे कलम ८२ अन्वये संपूर्ण जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे. ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या व्यवहारात सहायक दुय्यम निबंधक आणि पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाची फसवणूक करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने बनावट एन ए दाखले जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सावळाराम भिमाजी कऱ्हे, सीताराम कऱ्हे, मंगल कऱ्हे, मंगल कोळपे, अंजना बापू कोळपे, बायडाबाई जालींदर मिसाळ, लता राजाराम कोळपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रकरणाचा दाखल जोडून दुय्यम निबंधक व पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांची फसवणूक केल्याबद्दल अरुण कृष्णा अल्हाट, पुष्पवती सोनवणे, विजया मुकुंदा साळवे, कल्पना खंडुजी कदम यांच्यातर्फे कुलमुख्यातर म्हणून सुशांत अनिल पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सिद्धनाथ डेव्हलपर्सतर्फे जहाँगीर हुसेन हमजुद्दीन मुल्ला (रा. आंबेगाव बु़) यांच्या विरोधात आणि श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फे भागीदार पोपट बबन पायगुडे (रा. कात्रज) आणि हेमचंद सोमनाथ भाटी (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दस्ताला बनावट दाखले जोडून उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची फसवणूक केल्याप्रकरणी समीर गोविंद कडू (रा. सुखसागरनगर, कात्रज) व त्यांना मदत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सातव पाटील एंटरप्रायसेस तर्फे निखील किसन सातव (रा. वाघोली) आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पडताळणी समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल दिल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply