प्रयागराज हिंसाचारातील आरोपीचे घर जमीनदोस्त, सापडली शस्त्रं; भिवंडीत तरुणाला घेराव; ५ महत्वाचे मुद्दे

गेल्या शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर रविवारी उत्तर भारतातील अनेक शहरांमधील परिस्थिती तणावपूर्ण होती. उत्तर प्रदेशातील सहारनपूर हिंसाचारातील कथित आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवल्यानंतर रविवारी प्रयागराज येथील आणखी एका संशयित आरोपीचे घर मोठय़ा पोलीस बंदोबस्तात बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान शस्त्रं सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक शेरेबाजीच्या निषेधार्थ शुक्रवारी प्रयागराज येथे निदर्शनांदरम्यान हिंसाचार घडला होता. हिंसाचारातील अन्य आरोपींसह मोहम्मद जावेद हेही एक कथित आरोपी असून त्यांचे बेकायदा निवासस्थान रविवारी बुलडोझरने पाडण्यात आले. हे घर पाडण्यासाठी तीन बुलडोझरचा वापर करण्यात आला. पाच तास ही कारवाई सुरु होती.

प्रयागराज विकास प्राधिकरणाने (पीडीए) ही कारवाई केली. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या जावेद यांना आधी नोटीस बजावून घर रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. जावेद अटकेत असून शुक्रवारी प्रयागराज येथे घडलेल्या हिंसाचाराच्या कटातील ते एक आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला. अन्य आरोपींच्या चौकशी दरम्यान जावेद यांचा हिंसाचारातील सहभाग उघड झाला. त्यांनी लोकांना बंद पाळण्याचे आवाहन करून निदर्शनांसाठी एकत्र येण्याचा संदेश व्हॉटसअ‍ॅपद्वारे प्रसारित केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

१) १० जून रोजी झालेल्या हिंसाचारातील कथित मास्टरमाइंड जावेद मोहम्मद याच्या घरावर प्रयागराज विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवत कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घऱात शोध घेतला असता दोन बेकायदेशीर बंदुका, जिवंत काडतुसं आणि धारदार शस्त्र सापडलं आहे. न्यायव्यवस्थेवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलेली कागदपत्रंही सापडली आहेत.

२) प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात जमावाने ट्रेनवर हल्ला केला. तर दुसरीकडे धुबुलिया रेल्वे स्थानकावर तोडफोड करण्यात आली. यावेळी काही रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी जखमी झाले.

३) भिवंडीमध्ये नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचं समर्थन केल्यानंतर भिवंडी येथील साद अशफाक अन्सारी या मुलाला जमावाने घेरलं होतं. सोशल मीडियावरुन त्याने नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला होता. जमावाने त्याला धमकावलं तसंच कलमा बोलण्यास भाग पाडलं. नंतर भिवंडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. काही वेळाने सोशल मीडियावर #StandWithSaadAnsari ट्रेंडिंग होत होतं.

४) दंगलखोरांवर कारवाई करताना कानपूर विकास प्राधिकरणाने रविवारी ३ जून रोजी झालेल्या हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम करण्यात आलं होतं. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सहारनपूर, प्रयागराज आणि कानपूरमध्ये कारवाई करत बांधकाम जमीनदोस्त केलं आहे.

५) यादरम्यान जमात-ए-इस्लामीची युवा संघटना स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO) उत्तर प्रदेश भवनच्या बाहेर सोमवारी आंदोलन करणार आहे. जावेद मोहम्मदच्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply