पुण्यात अप्पा बळवंत चौकामध्ये कोयता गँगकडून महाविद्यालयीन युवकावर वार, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

पुणे - शहरात कोयता गॅंगने उच्छाद मांडला असून, कोयत्याचा सुळसुळाट झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या अप्पा बळवंत चौक परिसरात भरदिवसा अल्पवयीन मुलांनी राडा करीत एका विद्यार्थ्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये नूमवि शाळेतील एक १७ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

बाजीराव रस्त्यावरील नूमवि शाळेपासून अप्पा बळवंत चौक यादरम्यान सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा थरार सुरू होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नूमवि शाळेपासून अप्पा बळवंत चौकाच्या दिशेने १५ ते १६ तरुण मुले एका विद्यार्थ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठलाग करत होती. त्यामध्ये एकाच्या हातात कोयता होता.

या मुलांपैकी एकाने या विद्यार्थ्याच्या डोक्यात वार केला. या घटनेत जखमी झालेला विद्यार्थी हा नूमवि शाळेतील आहे. तर, वार करणाऱ्या मुलाच्या हाताला कोयता लागल्यामुळे तोही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी तिघांना अप्पा बळवंत चौकाजवळ असलेल्या एका वाड्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी सचिन कांबळे यांनी जखमींना ससून रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या मुलांचा जबाब घेण्यात येत असून, गुन्हा दाखल करण्यात येईल, असे विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.

हल्ला करणाऱ्या मुलांपैकी काहीजण जनता वसाहतमधील असल्याची माहिती समोर आली आहे. ‘माझ्या मैत्रिणीकडे का बघितले, तूच होतास का’, असे म्हणत या अल्पवयीन मुलांनी विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *