पुणे : हळदीच्या आदल्या दिवशी वधूचे पलायन; वधूच्या आई-वडिलांकडून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तर वरपित्याकडून बदनामीची तक्रार

हळदी समारंभाच्या आदल्या दिवशी वधूने पलायन केल्यामुळे समाजात बदनामी तसेच फसवणूक झाल्याची फिर्याद वर पित्याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नियोजित वधू, वधू पिता,आई आणि भावा विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिघीतील एका ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील तरुणीचा फिर्यादीच्या मुलाशी विवाह निश्चित करण्यात आला होता. वधू-वर पक्षाच्या सहमतीने एक मे ही विवाहाची तारीख ठरविण्यात आली होती. विवाहाची तयारीही झाली होती. वर पक्षाकडून कपडे खरेदीसाठी (बस्ता) ८० हजार, मंगलपत्रिकेसाठी ७ हजार, तसेच अन्य तयारीसाठी ७५ हजार रुपये असा एक लाख ६२ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला होता. २९ एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यासाठी वर पक्षाकडील सर्व नातेवाईक जमले होते. आदल्या दिवशी २८ एप्रिल रोजी नियोजित वधू पसार झाली. तिच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

याबाबतची माहिती समजल्यानंतर २९ एप्रिलचा हळद तसेच विवाहाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे सर्व पाहुण्यांमध्ये बदनामी झाल्याने वरपित्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि बदनामी तसेच फसवणुकीची तक्रार दिली. पसार झालेल्या तरुणीचा पोलीस शोध घेत असून पोलीस उपनिरीक्षक कोल्लुरे तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply