पुणे : ससून रुग्णालयाला क्षयरोगाची ‘ॲलर्जी

पुणे : ससून रुग्णालयातील १८०० पैकी फक्त ७२ खाटा मिळविण्यासाठी एक-दोन नाही तर १६ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण, ससून रुग्णालयाला क्षयरोगाची ‘ॲलर्जी’ असल्याप्रमाणे प्रशासनाचा कारभार सुरू असल्याचे ‘निदान’ झाले आहे.बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालयात श्वसनरोग शास्त्र विभागांतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. या विभागात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे राष्ट्रीय वैद्यक परिषदेच्या (एमएनसी) मानकानुसार येथील रुग्णांना पायाभूत सुविधा असल्या पाहिजे.

त्यासाठी विभागाला सुरवातीपासून ६० खाटा मिळाल्या होत्या. पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्याने अतिरिक्त १२ खाटांची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे यापूर्वी ७२ खाटांचा स्वतंत्र वॉर्ड होता. त्यात स्त्री आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. पण, २००६-०७ मध्ये ११ मजली इमारत बांधण्यासाठी हा वॉर्ड जमीनदोस्त केला. तेव्हापासून या क्षयरोगाच्या रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. याची गंभीर दखल मानवी हक्क आयोगानेही घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये ४० जागा आणि इतर चार वॉर्डमध्ये प्रत्येकी पाच या प्रमाणे २० खाटा राखीव केल्या.

११ मजली इमारत तयार होऊन एक-एक विभाग एकेका मजल्यावर स्थलांतरित होऊ लागला. पण, ज्या जागेवर इमारत उभी आहे, तो क्षयरोग विभाग दुर्लक्षित असल्याची खंत येथील डॉक्टरांनी व्यक्त केली. रुग्णालयात एकाच ठिकाणी क्षयरोगाच्या रुग्णांसाठी वॉर्ड मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला आता प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होत असताना दिसत आहे, असेही येथील डॉक्टरांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply