पुणे : ससून रुग्णालयात कोयता गँगची दहशत

ससून रुग्णालयाच्या आवारात हडपसर भागातील गुन्हेगारी टोळ्यांमधील सराईत गुन्हेगारांचा वाद झाला. सराईतांनी एकमेकांवर कोयते उगारुन दहशत माजविली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात घबराट उडाली.

हडपसरमधील रामटेकडी परिसरातील सराईतांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमधील सराईत हडपसर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्या वेळी हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी त्यांच्या बरोबर होते. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाच्या (ओपीडी) दोन टोळ्यांमधील सराइत समोरासमोर आले. सराइतांच्या साथीदारांनी एकमेकांना शिवीगाळ करुन कोयते उगारुन दहशत माजविली.

ससून रुग्णालयाच्या आवारातील सुरक्षारक्षक आणि हडपसर पोलिसांच्या पथकाने सराईतांना रोखण्याचा प्रयत्न केला. हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात दोन टोळ्यांमधील सराईतांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयात येरवडा कारागृहातून उपचारासाठी दाखल झालेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता तुषार हंबीर याच्यावर हल्ला झाला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply