पुणे : संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाची तयारी;रुग्णालयांतील प्राणवायू, खाटा,पायाभूत सुविधांची तपासणी

पुणे : करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार असलेल्या बीएफ.७ मुळे चीन, अमेरिका, ब्राझील, फ्रान्स अशा प्रमुख देशांमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच देशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोना महासाथीचे केंद्र ठरलेले पुणेही याला अपवाद नाही. शहर आणि परिसरातील रुग्णसंख्या अद्याप स्थिर असून रुग्णसंख्येत वाढ दिसली तर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी तयारी रुग्णालय स्तरावर करण्यात येत आहे.

करोनाच्या संभाव्य रुग्णवाढीशी दोन हात करण्यासाठी देशभर आपत्ती निवारणार्थ सराव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्याचा भाग म्हणून शहरातही असे प्रात्यक्षिक राबवण्यात आले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात ससून रुग्णालयासह पुणे महापालिकेचे नायडू रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, तातडीचा उपाय म्हणून उभारण्यात आलेली जंबो रुग्णालये आणि खासगी रुग्णालये या सगळ्यांचेच योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. महासाथीची तीव्रता वाढू लागताच प्राणवायूचा पुरवठा सुरळीत राखण्याचे आव्हान संपूर्ण आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले. सध्या चर्चेत असलेल्या बीएफ.७ या ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा संसर्ग भारतात अद्याप अत्यल्प प्रमाणात असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयांकडून सर्व प्रकारच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. औंध जिल्हा रुग्णालयातील उपकरणे, पायाभूत सुविधा आणि प्राणवायूचा साठा यांबाबतची उपलब्धता प्रशासनाकडून तपासली जात आहे.या पार्श्वभूमीवर महापालिकेचे साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी बीएफ.७ च्या पार्श्वभूमीवर काळजीचे कारण नसल्याचे सांगितले आहे. डॉ. वावरे म्हणाले,की महासाथीच्या सुरुवातीच्या काळात अचानक ओढवलेली परिस्थिती हाताळणे हे आव्हानात्मक होते, मात्र आता आपण साथरोगाच्या सर्व प्रकारच्या टप्प्यांचा अनुभव घेतला आहे.

सर्व रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा, औषधे, उपकरणे, प्राणवायू यांचा पुरेसा पुरवठा आहे. रुग्णसंख्येत वाढ दिसल्यास त्याचा योग्य वापर करणे शक्य आहे, मात्र शहर आणि देशातील सद्य:स्थिती पाहता त्याची आवश्यकता भासण्याची शक्यताही कमी असल्याचे डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply