पुणे शहरातील भूलतज्ज्ञांची येत्या महाराष्ट्रदिनी ( रविवारी ) जनजागृतीपर प्रभात फेरी

पुणे : पुणे शहरातील सर्व भूलतज्ज्ञ येत्या महाराष्ट्रदिनी (रविवारी) शहरात जनजागृतीपर प्रभात फेरी काढणार आहेत. शहरातील भूलतज्ज्ञांची अशा पद्धतीची ही पहिलीच प्रभात फेरी आहे. भूलतज्ज्ञांच्या इंडियन सोसायटी आॅफ ॲनेस्थेशियालॉजिस्ट या संघटनेच्या (आय.एस. ए.) स्थापनेला यंदा ७५ वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने या संघटनेच्या महाराष्ट्र स्टेट व पुणे शहर शाखेच्यावतीने ही प्रभात फेरी काढण्यात येत आहे. या प्रभात फेरीमध्ये शहरातील भूलतज्ज्ञ सहभागी होणार असल्याचे या संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा भालेराव व सचिव भूलतज्ज्ञ डॉ. सुनीता खेडकर यांनी सांगितले.

येत्या रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत ही प्रभातफेरी बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय मार्ग, फर्गसन महाविद्यालय मार्ग, जंगली महाराज रस्ता अशी काढली जाणार आहे. या प्रभात फेरीमध्ये नागरिकांच्या जनजागृतीसाठी जीवनसंजिवनी प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. कोणत्याही आजाराची शस्त्रक्रिया करावयाची असेल तर, तेथे भूलतज्ज्ञांचा संबंध येतोच. मात्र नागरिकांमध्ये या पडद्यामागच्या रुग्णसेवेविषयी फारशी माहिती नाही.

अगदी कोरोना संसर्गाच्या काळातही कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर लावणे, म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणे आदींमध्ये भूलतज्ज्ञांचा मोठा वाटा असतो. ह्रदय बंद पडल्यानंतर रुग्णांचा जीव कसा वाचवावा, याबाबतची प्रथमोपचार पद्धती, जीवनदाता कसे बनावे, याबाबत या प्रभात फेरीत जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृतीबबतचा पुणेकरांनी लाभ घेण्याचे आवाहन या संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा भालेराव, सचिव डॉ. सुनीता खेडकर, खजिनदार डॉ. सुषमा तांदळे, डॉ. पल्लवी बटयानी,डॉ. अर्चना जाना,डॉ.हनुमंत साळे आदींसह आय. एस. ए. च्या पुणे शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply