पुणे : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांचे हात वर

पुणे : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाला तळेगाव येथील जागेचे संपादनाचा प्रस्ताव सरकार दरबारी दोन वर्षे रखडला असल्याच्या चर्चेने जोर धरला असला, तरी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. भूसंपादनाबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच प्रकल्प स्थलांतराबाबतही मौन बाळगत हात वर केले आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) तळेगाव टप्पा चारमध्ये पाच हजार एकरपेक्षा जास्त जागेचे भूसंपादन प्रस्तावित केले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना काढणे आणि भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, करोना, टाळेबंदी अशा विविध कारणांमुळे त्यावर काहीच कार्यवाही होऊ शकली नाही. तसेच वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगाव टप्पा चारमध्येच प्रस्तावित करण्यात आला होता किंवा कसे, याबाबत जिल्हा प्रशासन, एमआयडीसी आणि उद्योग पुणे विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.

उद्योग पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, ‘कंपनीच्या लोकांनी चार-पाच भेटी दिल्या. तसेच त्यांनी त्रयस्थ संस्थांकडून या ठिकाणच्या प्रकल्पाबाबत सर्वेक्षणही केले होते. ही प्रक्रिया दीड वर्षे चालली आणि अचानक ही कंपनी गुजरातला गेल्याचे समजले. एवढी मोठी गुंतवणूक येताना त्याबाबत सचिव पातळीवर चर्चा होत असतात. स्थानिक पातळीवर केवळ कंपनीच्या लोकांना जागा दाखवणे आणि काय-काय सुविधा देऊ शकतो, एवढेच सांगण्यात येते. त्यामुळे याबाबत अधिक माहिती नाही.’

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply