पुणे विमानतळावरून लवकरच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मालवाहतूकही; केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

पुणे : पुणे शहरातील उद्योगांचा विस्तार आणि गरज लक्षात घेता पुणे विमानतळावरून लवकरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केली. पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल मे २०२३ पर्यंत सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे विमानतळाजवळ उभारण्यात आलेल्या बहुमजली वाहनतळाचे (एरोमॉल) उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके आदी त्या वेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले,की पुण्यावरून १२ नोव्हेंबरपासून बँकाॅकची थेट विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. आता १ डिसेंबरपासून सिंगापूरलाही थेट विमान सेवा सुरू होईल. पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलचा विस्तार मे २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून त्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह उद्योगांचा विस्तार आणि मागणी लक्षात घेता पुण्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार आहे. पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. कला, संस्कृती, व्यापार, औद्योगिकनगरी अशी या शहराची वैशिष्ट्यं आहेत. पुण्याचा नावलौकिक केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी आवश्यक त्या सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

वाहनतळाच्या उद्घाटनानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यासाठी नियोजित असलेल्या पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, ‘सगळे होईल हो’ इतकीच प्रतिक्रिया देत त्यांनी याबाबत कोणतेही सविस्तर भाष्य केले नाही.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांचे संपूर्ण भाषण मराठीतून केले. त्यात त्यांनी महाराष्ट्र आणि पुणे शहराशी असलेले शिंदे परिवाराची असलेली जवळीकही उलगडली. ते म्हणाले,की पुण्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. लहानपण मुंबईत गेले, पण प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आम्ही पुण्यात असायचो. याच ठिकाणी महादजींची छत्री आहे. त्यामुळे ग्वाल्हेरप्रमाणेच माझ्या दृष्टीने पुण्यालाही तितकेच महत्त्व आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply