पुणे : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक; मुंबईतील एकाच्या विरोधात गुन्हा

पुणे : रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने कोथरुड भागातील एकाची १४ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाषचंद्र कटोच (रा. बीएआरसी काॅलनी, अणुशक्तीनगर, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कोथरुड भागात राहायला असून ते महापालिकेत नाेकरी करतात. आरोपी कटोच याची काही महिन्यांपूर्वी तक्रारदाराची ओळख झाली होती. तक्रारदाराची मुलगी आणि पुतण्याला रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष कटोचने दाखविले होते. त्यानंतर कटोचने त्यांना वाराणसीतील रेल्वे हाॅस्पिटल, हाजीपूरमधील एक हाॅटेल; तसेच दिल्लीत बोलावून घेतले होते.

रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून वेळोवेळी १४ लाख १८ रुपये उकळले होते. दरम्यान, तक्रारदाराची मुलगी आणि पुतण्या यांना नोकरी लावली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काजोल यादव तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply