पुणे रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका; एप्रिलमध्ये ३६ हजारांहून अधिक जणांवर केली कारवाई

पुणे रेल्वेकडून एप्रिल महिन्यामध्ये ३६ हजार ५७९ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून दंडापोटी तब्बल २ कोटी ४७ लाख ४८ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. पुणे रेल्वेकडून आतापर्यंत एका महिन्यात वसूल करण्यात आलेला हा सर्वाधिक दंड असल्याचे समोर आले आहे. या अगोदर एक महिन्यात एवढी मोठ्या प्रमाणावर दंडाची रक्कम कधीही वसूल झालेली नव्हती.

पुणे रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे उपनगरीय गाड्यांसाठी विशेष मोहिमांचे आयोजन केले जाते. या कारवाईमध्ये विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दंड न भरल्यास तुरुंगवासाची कारवाईही केली जाते. यंदा एप्रिल महिन्यातील कारवाईत पकडण्यात आलेल्या विनातिकीट प्रवाशांकडून उच्चांकी प्रमाणावर दंडाची वसुली करण्यात आली आहे. ३६ हजार ५७९ विनातिकीट प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. त्याखेरीज अनियमित प्रवासासाठी १०१ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार ७५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, जवळील साहित्याचे बुकिंग न करणाऱ्या २७३ जणांना पकडून त्यांना ४६ हजार ६२९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, अपर विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्याम कुलकर्णी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. व्ही. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

सध्या तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तिकीट तपासणी यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply