पुणे : राज ठाकरेंचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून पत्रवाटप; रोज अडीच हजार पुणेकरांच्या भेटीगाठी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्ररूपी विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास शहर मनसे पदाधिका-यांकडून प्रारंभ झाला आहे. त्याची सुरुवात मनसेचे प्राबल्य असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघापासून झाली आहे.

कोथरूड बरोबरच, शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती, हडपसर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात दररोज किमान अडीच हजार पत्रांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा शहर मनसे पदाधिका-यांनी केला आहे. आम्ही राज ठाकरे यांच्या पत्राचीच प्रतिक्षा करत आहोत, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेवेळी त्यांचे विचार पत्ररुपाने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे जाहीर केले होते. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यात यावेत अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसैनिकांनी राज्यभर आंदोलने केली होती. पुण्यातही आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन कायम राहील, असे राज यांनी जाहीर करतानाच त्यामागील भूमिका पत्ररुपाने नागरिकांपर्यंत पोहचोविण्यात येईल, असे पुण्यातील सभेत स्पष्ट केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांचे विचार पत्राद्वारे राज्यभरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्याचे वितरण सध्या सुरू झाले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून या वितरणाला प्रारंभ झाला. राज ठाकरे यांच्या पत्राबरोबरच समस्या सांगण्याबाबतचा एक अर्ज नागरिकांना दिला जात आहे. त्यावर त्या-त्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांबरोबरच पदाधिका-यांची नावे आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात या पत्ररूपी विचारांचे वाटप सुरू झाले आहे. शहर पदाधिका-यांनी स्वखर्चाने त्याच्या प्रतींच्या फोटोकॉपी (झेरॉक्स) काढल्या असून त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती मनसे नेते किशोर शिंदे यांनी दिली.

गेल्या आठवड्यापासून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे. दररोज पदाधिकारी सरासरी अडीच हजार नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्या आठही मतदारसंघात मिळून पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त पत्रांचे वितरण करण्यात आले आहे. राज ठाकरे यांचे विचार पटत आहेत. दररोजच्या समस्यांबाबतही नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असून त्याची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचा दावा मनसे पदाधिका-यांकडून करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply