पुणे राज्यात सर्वांत थंड; ऑक्टोबरमधील दहा वर्षांतील दुसरे नीचांकी तापमान

पुणे: मोसमी पाऊस माघारी फिरताच अवतरलेल्या थंडीचा कडाका पुणे शहरामध्ये वाढतच आहे. गेल्या सहा दिवसांत सातत्याने रात्रीच्या किमान तापमानाचा नीचांक नोंदविला जात असतानाच शहरात रविवारी (३० ऑक्टोबर) संपूर्ण राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुण्याची रात्र महाबळेश्वरपेक्षाही थंड ठरली. विशेष म्हणजे हे तापमान ऑक्टोबर महिन्यातील गेल्या दहा वर्षांमधील दुसरे नीचांकी तापमान ठरले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर थंडी कायम राहणार असून, तापमानात किंचित चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

मोसमी पाऊस माघारी फिरल्याच्या दिवसापासून शहरातील तापमानात एकदमच पाच ते सहा अंशांनी घट होऊन थंडी अवतरली. तापमानातील ही घट २३ ऑक्टोबरपासून कायम आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातही सर्व ठिकाणी सध्या निरभ्र आकाश असून, कोरड्या हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होण्यास पोषक वातावरण आहे. त्यामुळे दररोजच शहराच्या तापमानात काही प्रमाणात घट होत असताना दिसून येत असून, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. थंडीचा कडाका वाढला असल्याने नागरिकांना आता रात्री स्वेटर, कानटोपीचा वापर करावा लागत आहे.

पुणे शहरात २४ ऑक्टोबरला १४.४ अंश सेल्सिअस, तर २५ ऑक्टोबरला १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. २६ आणि २७ ऑक्टोबरला १४.३ अंश सेल्सिअसवर किमान तापमान होते. २८ ऑक्टोबरला तापमानात पुन्हा घट होऊन १३.८ अंश सेल्सिअस किमान नोंदविले गेले. २९ ऑक्टोबरला यंदाच्या हंगामातील नीचांकी १३.३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा खाली आला होता. मात्र, शनिवारचा हा नीचांक दुसऱ्याच दिवशी मोडला गेला. रविवारी शहरातील किमान तापमानाचा पारा १२.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. शहरातील हे तापमान सरासरीच्या तुलनेत ३.२ अंशांनी कमी होते. त्यामुळे पहाटे चांगलाच गारवा जाणवत होता.

३० ऑक्टोबर आणि नीचांकी तापमानाचा योगायोग

रविवारी (३० ऑक्टोबर) शहरात गेल्या दहा वर्षांतील दुसरे नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. यापूर्वी २०१६ मध्ये ३० ऑक्टोबरलाच १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. रविवारच्या किमान तापमानाने गेल्या पाच वर्षांतील नीचांक नोंदविला गेला. विशेष म्हणजे २०१२, २०१८ आणि २०२१ या तीन वर्षांतही ३० ऑक्टोबरलाच त्या महिन्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान अनुक्रमे १२.७ अंश, १३.२ अंश आणि १४.४ अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात ऑक्टोबरमधील आजवरचे सर्वांत नीचांकी किमान तापमान १९६८ मध्ये २९ तारखेला ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply