पुणे : रांजणी येथे ऊसाची तोड सुरू असताना दोन बछडे आढळले

निरगुडसर - रांजणी, ता. आंबेगाव येथील कार मळ्यात शेतकरी सुनील बबन वाघ व सदाशिव बापू वाघ यांची ऊस तोड सुरू असताना दोन ते अडीच महिन्याचे बछडे आढळून आल्याची घटना रविवार ता.१७ रोजी सकाळी घडली . कारमाळा येथील जुनीविहीर वस्तीत सुनील बबन वाघ व सदाशिव बापू वाघ यांच्या शेतात गेली पाच-सहा दिवसांपासून उसाची तोड सुरू असून रविवारी सकाळी ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये घबराट पसरली.

मुकादम अर्जुन पंढरीनाथ जाधव यांनी कारखाना प्रशासनाला ही माहिती दिल्यानंतर भीमाशंकर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे यांनी घटनास्थळी आले तसेच वनविभागाचे वनपाल विजय वेलकर, वनरक्षक पी. के. पवार, वनमजूर महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही बिबट बछड्यांना ताब्यात घेतले. हे दोन्ही बछडे अंदाजे दोन अडीच महिन्याचे असून त्यांना अवसरी घाट येथील वनसावित्री उद्यानात सुरक्षितरित्या देखरेखी खाली ठेवले जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले सायंकाळी उशिरा पुन्हा त्याच उसाच्या शेतामध्ये बिबट मादी जवळ दोन्ही बछडे सोडण्यात येणार असल्याचे वनरक्षक पी. के. पवार यांनी सांगितले. बिबट बछडे आढळून आल्याने उसतोडणीचे काम थांबवण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply