पुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय

करोनानंतर जगभरात साथरोग आजारावरील संशोधनाचे महत्व अधोरेखित झाले आहे.  राज्यात करोनाबाधित सर्वाधिक मृ्त्यूंची नोंद झाली असून या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी पुणे येथे २०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

दोन वर्षांत करोनाची अनेक रूपे समोर आल्यामुळे भविष्यातील साथरोग आजारांचा विचार करून अनेक देशांनी सुसज्ज प्रयोगशाळा तसेच साथरोग रुग्णालये उभारण्याचा विचार सुरू केला. राज्याच्या आरोग्य विभागाने साथरोग आजाराचा मुकाबला करण्याची अत्याधुनिक प्रयोगशाळा तसेच साथरोग रुग्णालय उभारण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. यातूनच सुरुवातीला पुणे येथील औंध उरो रुग्णालयाची जागा साथरोग रुग्णालय उभारण्यासाठी निश्चित करण्यात आली होती.

 अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय हेही संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांसाठी अधिग्रहित करण्याची योजना असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. औंध उरो रुग्णालयात ६०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्यात येणार होत्या. यात पहिल्या टप्प्यात २०० खाटांची व्यवस्था केली जाणार होती. मात्र औंध येथील रुग्णालयाच्या जागेची पाहणी केल्यानंतर सदर जागेऐवजी पुणे येथील डॉ. बंदोरवाला आशासकीय रुग्णालयातील पाच हेक्टर जागेवर संसर्गजन्य रोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णालय उभारणीसाठीचा सविस्तर प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला असून तो मान्यतेसाठी आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २०० खाटांचे सुसज्ज साथरोग रुग्णालय उभारण्यात येणार असून पुढील टप्प्यात ५०० खाटांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील २०० खाटांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून मेंदूच्या आजारावरील रुग्णांसाठी २० खाटा, श्वसन आजारासाठी २० खाटा तर तापाच्या रुग्णांसाठी २० खाटा आणि लहान मुलांसाठी १० खाटांची निर्मिती करण्यात येणार आहे. रुग्णालय उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या ठिकाणी साथरोग प्रशिक्षण, संशोधन, उपचार व संदर्भ सेवा यांची व्यवस्था असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply