पुणे : मोटारींच्या काचा फोडून चोरीचे ४१ गुन्हे उघड ; हरियाणा, दिल्लीतील चोरटे गजाआड; १६ लॅपटाॅप जप्त

पुणे : मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप, तसेच मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या हरियाणातील चोरट्यासह साथीदाराला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून ४१ गुन्हे उघडकीस आले असून ८ लाख ३५ हजार रुपयांचे १६ लॅपटाॅप जप्त करण्यात आले आहेत.

विकी धरमपाल ठाकूर (वय ३४, सध्या रा. बालेवाडी, मूळ रा. सच्चाखेडा, हरियाणा), सुशीलकुमार उर्फ बिंदू (रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. ठाकूर केशकर्तनालयात कारागीर आहे. ठाकूर आणि साथीदार बिंदू याने शहरातील वेगवेगळ्या भागात मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप; तसेच मौल्यवान ऐवज लांबविला होता. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. गणेशखिंड रस्त्यावर चोरटे थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला मिळाली. एक जण कमी किंमतीत लॅपटाॅप विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून ठाकूर आणि साथाीदारास ताब्यात घेतले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, जयदीप पाटील, महेंद्र पवार, अजय गायकवाड, हरिश मोरे, सारस साळवी आदींनी ही कारवाई केली.

आरोपी ठाकूर आणि साथीदार चोरी करण्यासाठी दिल्लीहून विमानाने पुण्यात यायचे. चोरी केल्यानंतर पिशवीतील कागदपत्रे नदीत फेकून द्यायचे. लॅपटाॅप, मौल्यवान ऐवजाची स्वस्तात विक्री करुन आरोपी विमानाने दिल्लीला पसार व्हायचे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply