पुणे : मुसळधार पावसानं हादरला कात्रजचा घाट; तिसऱ्यांदा दरड कोसळली

कात्रज : पुणे जिल्ह्यातील कात्रज परिसरात पावसानं रौद्ररूप धारण केलं आहे. मुसळधार पाऊस सुरू असून, बुधवारी दुपारच्या वेळी कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळली. टेकडीवरील मोठमोठे दगड थेट रस्त्यावर आले. त्यामुळे काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

मुसळधार पावसानं कात्रज घाट परिसर हादरून गेला आहे. कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळून टेकडीवरचे मोठमोठे दगड थेट रस्त्यावर आले होते. या घटनेची माहिती मिळताच, धनकवडी सहकारनगर विभागीय कार्यालयाचे आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील दगड बाजूला केले. धनकवडी सहायक आयुक्त विजय वाघमोडे यांनी ही माहिती दिली.

कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळली. डोंगरावरून चार ते पाच भलेमोठे दगड थेट रस्त्यावर आले होते. दोन दगड तर रस्त्याच्या मध्यभागीच आले होते. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन तेथून न गेल्याने अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्याच्या मधोमध दगड आल्याने काही वेळासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

मागील काही तासांपासून, परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कात्रज घाटात दरड कोसळण्याची मागील १५ दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

कात्रज घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे आहे. देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हात वर करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. अशावेळी दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून, यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply