पुणे : मुळशी धरण परिसरात जमिनीला भेगा; परिसरातील नागरिकांचे स्थलांतर

पुणे : मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली असून त्याचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (जीएसआय) सर्वेक्षण करण्याबाबत कळवले आहे. दरम्यान, या परिसरातील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे. तर, मुळशी धरण परिसरात नोंद झालेली कंपने भूकंपाची नसून अतिशय कमी तीव्रतेची असल्याची माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली.

मुळशी तालुक्याच्या धरण भागात मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे तब्बल ५०० मीटर जमीन दुभंगली आहे. टाटा पॉवरने मुळशी धरण परिसरात भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाल्याबाबत प्रथमदर्शनी कळवले होते. मात्र, हा भूकंप नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. नोंद झालेली कंपने अतिशय कमी तीव्रतेची (०.२ जी) असल्याचे दिसून आले, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. त्यामुळे लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे जमिनीला भेगा पडण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे जीएसआयला कळवले आहे.

याबाबत बोलताना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे म्हणाले, ‘मुळशी धरण हे टाटा कंपनीच्या अख्यत्यारीत येते. ही दोन्ही गावे धरण परिसरातील आहेत. याठिकाणी दहा-पंधरा घरे असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी संबंधितांना सुखरूपस्थळी हलविण्यात आले आहे. मात्र, संबंधितांच्या कायमस्वरूपी स्थलांतराबाबत टाटा कंपनीलाच निर्णय घ्यावा लागणार आहे. याबाबत कंपनीला जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वाघवाडी येथील जमीन खचली होती. जमिनीला मोठी भेग, रस्त्यांना भेगा आणि घरांच्या भितींना सुद्धा भेगा पडल्या आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भेगा पडल्याचा कारणांचा शोध घेण्यात येत आहे.’

सर्वेक्षण करून माहिती द्या

लिंबारवाडी आणि वाघवाडी या दोन्ही गावांमध्ये खचलेल्या जागांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था यांना दिल्या आहेत. सर्वेक्षण करून लवकर अहवाल मिळाल्यास आवश्यक ती कार्यवाही करणे सोपे होणार आहे. तसेच याबाबत टाटा कंपनीलादेखील कळविण्यात आले आहे, असेही बनोटे यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply