पुणे : मालमत्ता खरेदी करतानाच त्यावरील थकबाकीही समजणार; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची सुविधा

पुणे : मालमत्ता खरेदी करताना खरेदीदाराला संबंधित मालमत्तेवरील मालमत्ता कर, पाणी कर आणि वीज देयकाच्या थकबाकीसह मालमत्ताधारकाचा तपशील समजणार आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहारांत आणखी पारदर्शकता येणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून पब्लिक डाटा एन्ट्री (पीडीई) या पर्यायात नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे.

संगणकीकृत दस्त नोंदणी पद्धतीमध्ये दस्तविषयक माहिती म्हणजेच मिळकत, दस्तातील पक्षकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, ओळखदार इत्यादी विषयांची माहिती संगणकात भरावी लागते. ही माहिती पक्षकाराला स्वतःला कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणाहून भरता यावी, याकरिता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर पब्लिक डाटा एन्ट्री ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पब्लिक डाटा एन्ट्रीद्वारे पक्षकार स्वतःच्या दस्ताची माहिती केव्हाही आणि कोठूूनही भरु शकतात. ही माहिती पक्षकार स्वतः भरत असल्याने अधिक अचूक असते. दस्त नोंदणीसाठी पक्षकारांचा दुय्यम निबंधक कार्यालयातील वेळ वाचतो. नागरिकांनी स्वतःच संगणकाचा वापर करून पब्लिक डाटा एन्ट्रीद्वारे माहिती भरल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, या सुविधेचा वापर न करता आपल्या दस्ताची सर्व माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून भरल्यास त्यासाठी २० रुपये शुल्क आकारले जाते.

दरम्यान, या पीडीई या पर्यायामध्ये सुधारणा करण्यात आली असून त्याद्वारे आता मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना संबंधित मालमत्ताधारकाचा तपशील, मालमत्तेवरील मालमत्ता कर, पाणी कर आणि वीज देयकांची थकबाकी समजणार आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार अधिक पारदर्शकपणे होणार असून फसवणुकीला वाव राहणार नाही, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply