पुणे : मागासवर्गीय उद्योजकांसाठी ‘व्हेंचर कॅपिटल फंड’- रामदास आठवले

पुणे : ‘‘आता मागणारे हात न होता देणारे हात व्हा. मागासवर्गीय उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ योजनेसाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल,’’ असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, २० मार्च फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक समतेचे उद्धिष्ट आणि व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ ही मागासवर्गातील उद्योगांची परिषद भरविण्यात आली होती.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उपमहापौर सुनीता वाडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, २० मार्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक अविचल धिवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनिल धिवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात हे ऑनलाइनद्वारे सहभागी झाले होते. ‘व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्युल कास्ट’ या योजनेतील त्रुटी दाखवत ही योजना अधिक चांगल्या प्रकारे कशी राबविता येईल, याबाबत धिवार यांनी सादरीकरण केले. ‘‘व्हेंचर कॅपिटल फंडप्रमाणे मागासवर्गीय नवउद्योजकांसाठी स्टार्टअप फंड द्यावा,’’ अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली.

‘‘मागासवर्गीय उद्योजकांची संख्या ही त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यातही घरगुती व लहान स्वरूपातील व्यवसाय अधिक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या उद्योगात मागासवर्गीयांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या मूळ प्रश्नांवर काम करायची गरज आहे. आजही जातीयवाद हा एक प्रमुख प्रश्न यांच्यासमोर आहे. सरकारने आर्थिक मदत वाढवून या मूळ प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे.’’



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *