पुणे: भिंत कोसळून महिलेसह सहा महिन्यांचे बालक जखमी

पुण्यातील गंज पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी घराची भिंत कोसळून महिलेसह सहा महिन्यांचे बालक जखमी झाले. दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य करून राडारोडा हटविला.

गंज पेठेतील मासे आळी परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घराची भिंत पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. दुमजली घराचा काही भाग शेजारी असलेल्या बैठ्या घराच्या पत्र्यावर कोसळल्याने सरस्वती सुदाम परदेशी (वय ५०), रुद्रांक्ष हर्षद परदेशी (वय सहा महिने) दोघे किरकोळ जखमी झाले. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन राडारोडा हटविला. परदेशी यांच्या घरातील गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, जवान प्रशांत मखरे, चंद्रकांत गावडे, तेजस भट, ओंकार बोंबले, गौरव कांबळे यांनी स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर तत्काळ बाहेर काढले.

शहरात शुक्रवारी दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. आगीत भाजल्याने एक जण जखमी झाला. कमिन्स कॉलेजजवळ गणेश डेअरी आणि स्वीट मार्ट या मिठाई विक्री दुकानातील भटारखान्यातील गॅस सिलेंडर लावताना सिलिंडरने अचानक पेट घेतला. दुसऱ्या सिलिंडरमधून गळती होत होती. पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. कामगार प्रवीण बद्रीनाथ वाघोरे यांच्या हाताला किरकोळ भाजल्याने ते किरकोळ जखमी झाले. कसबा पेठेतील कुंभारवाडा परिसरात एका घराच्या पहिल्या मजल्यावर दुपारी आग लागली. जवानांनी दहा मिनिटात आग आटोक्यात आणली. आगीत गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply