पुणे : बिगर बासमती तांदळाची उच्चांकी निर्यात

पुणे : भारतातून यंदा बिगर बासमती तांदळाची निर्यात १७० लाख टनापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सुगंधी आंबेमोहोर, इंद्रायणी, सोना मसुरी, सुरती कोलम आदी तांदळाच्या प्रकारांना परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्यावर्षी (२०२०-२१) भारतातून १३० लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात जगभरात करण्यात आली होती. आतापर्यंतच्या निर्यातीमधील गेल्या वर्षीची निर्यात उच्चांकी होती.

बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीतून ३५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. कोरोनाच्या संसर्गात देशात तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यामुळे आपण जास्तीत जास्त तांदूळ निर्यातीस पाठवू शकलो होतो. यंदा बिगर बासमती तांदळाचे उत्पादन १२२० लाख टन एवढे झाले आहे. त्यामुळे यंदा १७० लाख टनांपर्यंत निर्यात पोहचण्याची शक्यता आहे. त्याचे मूल्य ४५ हजार कोटी रुपये असेल, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.

भारतातून दहा वर्षांपूर्वी फक्त बासमती तांदळाची निर्यात होत होती. बिगर बासमती तांदूळ देशातून बाहेर पाठविण्यास निर्बंध होते. त्यावेळी देशातील तांदळाचे उत्पादन आणि मागणी समसमान होती. त्यामुळे भारतातून बिगर बासमती तांदळाची निर्यात होत नव्हती. २०११-१२ मध्ये साध्या तांदळाच्या निर्यातीबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन सरकारने काही अटींवर भारतातून तांदळाची निर्यात करण्यास परवानगी दिली. सुरुवातीच्या वर्षात देशातून ४० लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली होती. त्यावेळी निर्यातीतून नऊ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. गेल्या दहा वर्षांत देशातील तांदळाचे उत्पादन दरवर्षी वाढत जाऊन ते एक हजार लाख टनांवरून १२२० लाख टनांपर्यंत पोचले असल्याची माहिती तांदूळ निर्यातदार राजेश शहा यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply