पुणे : बारामतीकरांना नितीन गडकरींचे 778 कोटींचे गिफ्ट.

बारामती : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीकरांना घसघशीत भेट देऊ केली आहे. उंडवडी कडे पठार ते बारामतीतील देशमुख चौक व बारामतीतील ढवाण चौक ते फलटण पर्यंत या दोन रस्त्यांसाठी 778 कोटी 18 लाखांचा निधी नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी या बाबत नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचाच हा टप्पा असून उंडवडी कडे पठार ते बारामतीतील देशमुख चौक हा रस्ता चार पदरी डांबरी करण्यात येणार आहे. दरम्यान बारामती शहरातील नीलम पॅलेस हॉटेलच्या चौकापासून ते थेट फलटणपर्यंत 33 कि.मी. अंतराचा चार पदरी सिमेंट कॉक्रीटचा रस्ता साकारणार आहे. या रस्त्यासाठी अगोदरच भूसंपादन झालेले असल्याने जागेचा प्रश्न येणार नाही, याच्या निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षात हे काम मार्गी लावले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांना दिली. उंडवडी कडे पठार ते बारामतीतील देशमुख चौकापर्यंतचा रस्ताही चार पदरी होणार असून मध्ये दुभाजक असेल, वारकरी या रस्त्याचा वापर पालखी काळात करत असल्याने हा रस्ता डांबरीकरण होणार आहे. येथेही जागेची अडचण नसल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे बारामतीचे दळणवळण अधिक मजबूत होईल, बारामती फलटण रस्ता चार पदरी झाल्यामुळे सातारा, कोल्हापूरच्या दिशेने अधिक गतीने मार्गक्रमण करता येईल. पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता असल्याने त्याचा फायदा या दोन्हीही जिल्ह्यातील लोकांना होणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply