पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना सदनिका घेण्याची शेवटची संधी

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ऑनलाइन सोडतीमधील विजेत्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत सदनिका घेण्याची शेवटची संधी मिळणार आहे. कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. कागदपत्र पडताळणीसाठी न आलेल्या लाभार्थ्यांची सदनिका प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांला दिली जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी खराडी, हडपसर आणि वडगांव येथील पाच गृहप्रकल्पाअंतर्गत एकूण १ हजार ३० सदनिकांची ऑनलाइन सोडत ३० मार्च रोजी काढण्यात आली होती. या ऑनलाइन सोडतीमधील विजेत्या लाभार्थ्यांना त्वरीत कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून एसएमएस, दूरध्वनी तसेच टपालाने पत्र पाठवून कागदपत्रे पडताळणीसाठी लाभार्थ्यांना बोलविण्यात आले होते. मात्र बहुतांश लाभार्थी कागदपत्रे पडताळणीसाठी सावरकर भवन येथे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता या लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.

चार जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे.या कालावधीत कागदपत्रांची पडताळणीसाठी लाभार्थी न आल्यास ते सदनिका घेण्यास इच्छुक नाहीत, असे गृहीत धरून प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसाठीची कागदपत्र पडताळणी १७ जुलैपासून सुरू केली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आधार कार्ड, पॅनकार्ड, जातीचा दाखला (लागू असल्यास), उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला (भाडेकरार, वीज देयक, शिधापत्रक, बँक पासबुक), प्रतिज्ञापत्र, सह-अर्जदार अर्ज अशी कागदपत्रे त्यासाठी आवश्यक आहेत. प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply