पुणे : पूल पाण्याखाली ; मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत, दहा ते पंधरा चारचाकी नदीपात्रात अडकल्या

खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मुठा नदीवरील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे भिडे पूल गुरुवारी सायंकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने डेक्कन, शिवाजीनगर आणि मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, नदीपात्रात दहा ते पंधरा चारचाकी अडकल्या असून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीपात्र परिसरात पोलीस बंदोबस्ताबरोबरच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे मुठा नदीला पूर आला आणि बाबा भिडे पूल गुरुवारी सायंकाळी पाण्याखाली गेला. त्यामुळे नदीपात्रातील रस्त्याबरोबरच भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. डेक्कन, शिवाजीनगर, केळकर रस्ता, कोथरूड, जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह छत्रपती संभाजी महाराज पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडीतही भर पडली. खासगी कार्यालये सुटण्याच्या वेळीच पूल आणि नदीपात्रातील रस्ता वाहतूकासाठी बंद करण्यात आल्याने त्याचा अनेक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply