पुणे : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात तापमानाचा पारा किंचित घटला असला, तरी दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. उन्हाचा विक्रमी चटका देऊन एप्रिल महिना सरला. सध्या कमाल तापमानात किंचित घट नोंदिवण्यात येत असली, तरी काही भागात तापमानातील वाढ कायम आहे. त्याचबरोबरीने राज्यात पावसाळी वातावरणही तयार होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ४ आणि ५ मे रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती तयार होणार आहे. मात्र, ३ आणि ४ मे रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. काही भागांत विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सोमवारी (२ मे) विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात अद्यापही सर्वत्र तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे आणि सरासरीपेक्षा अधिक असला, तरी मागील आठवडय़ाच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली आहे. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्ये ४३ अंशांपुढे तापमान आहे. मध्य महाराष्ट्रात नगर येथे ४३.९, तर सोलापूर येथे ४२ अंश तापमानाची नोंद झाली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply