पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहूत ; स्वागताची जय्यत तयारी, तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू येथे येत आहेत. पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या करण्यात येत आहे. २० जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

मोदी यांच्या दौऱ्याची प्रशासकीय पातळीवरील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्रीय तसेच राज्यस्तरीय पथकाकडून सुरक्षिततेच्या सर्व बाबींची कसून तपासणी केली जात आहे. मंदिर परिसरात मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण असून समारंभात संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे.

डोईवर मध्यभागी विठ्ठलाची प्रतिमा, ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’, हा बुक्क्याने लिहिलेला अभंग, तुळशीच्या मण्यांनी केलेली बांधणी, टाळ, चिपळय़ा अशा वारकरी संप्रदायाच्या प्रतीकांचा वापर करून तुकाराम पगडी सजविण्यात आली आहे.

 पंतप्रधान मोदी हे दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी त्यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील. एक वाजून ४५ मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा २० मिनिटांचा लोकार्पण सोहळा होईल. दोन वाजून दहा मिनिटांनी ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. या ठिकाणी ५० मिनिटांची सभा होणार असून सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत.  येत्या २० जूनपासून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळय़ास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

पालखी प्रस्थानापूर्वी मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मार्गावर फलकही उभारण्यात आले आहेत.

मंदिर एकच दिवस बंद

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देहू संस्थानने मागे घेतला आहे. मोदींचा दौरा असणाऱ्या दिवशीच अर्थात मंगळवारी (१४ जून) मंदिर बंद राहणार आहे. तीन दिवस मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयावरून तीव्र नाराजी होती. त्यामुळे केवळ १४ जूनला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply