पुणे : नातेसंबंध, स्पर्धेमुळे ८१ टक्के तरुण पिढी तणावाखाली; वैयक्तिक, व्यावसायिक आयुष्यातील समतोल राखण्याचे आव्हान

पुणे : नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी असलेली जीवघेणी स्पर्धा, समाज माध्यमे आणि वैयक्तिक आणि व्यावयासिक आयुष्यात समतोल राखताना होणारी ओढाताण या प्रमुख कारणांमुळे भारतातील तरुण पिढी ताणतणावांचा सामना करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. देशातील शहरी भागात राहणाऱ्या सुमारे ८१ टक्के तरुण पिढीला या तणावाचा सामना करावा लागत आहे.

मानसिक आरोग्या दिनानिमित्त ‘आयटीसी फिआमा’ तर्फे भारतातील तरुणाई आणि तिच्यासमोरील मानसिक आरोग्याचे प्रश्न यांबाबत हे सर्वेक्षण घेण्यात आले. करिअर, नातेसंबंध आणि समाज माध्यमे ही तरुणाईच्या मानसिक स्थैर्याला आव्हान देणारी सर्वांत प्रमुख कारणे असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी अवघ्या ३३ टक्के तरुणांनाच ताणतणाव निवारणासाठी व्यावसायिक मदत घ्यावीशी वाटत असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

नकारात्मकतेचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होत असल्याचे एक महत्त्वाचे निरीक्षणही या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या तरुण पिढीकडून नोंदवण्यात येत आहे. पुरुषांच्या तुलनेत कामाचा ताण स्त्रियांना अधिक जाणवतो. ७१ टक्के स्त्रियांच्या मते यशाच्या समाजमान्य व्याख्येत स्वत:ला बसवताना त्यांची दमछाक होते. ८७ टक्के तरुण पिढीला नातेसंबंध, जोडीदाराशी नाते संपणे किंवा नात्यांतील दुरावा या गोष्टींचा ताण येतो. या वयोगटातील दर तीनपैकी एका व्यक्तीच्या मते नातेसंबंधांचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रचंड परिणाम होतो. तरुण पिढी ताण कमी करण्यासाठी काही पर्यायांचाही विचार करतात, जसे की मन शांत करण्यासाठी ४३ टक्के संगीताकडे वळतात. योग, ध्यानधारणा तसेच आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे हा ताणतणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठीचा पर्याय असल्याचे या तरुण पिढीकडून नमूद करण्यात येत आहे.

ताणतणाव कशामुळे?

  • नातेसंबंध, त्यातील फोलपणा किंवा तात्पुरतेपणा
  • कामाच्या ठिकाणी असलेली जीवघेणी स्पर्धा
  • वैयक्तिक आणि व्यावसायिक जगण्याचा समतोल राखताना होणारी ओढाताण
  • यशाच्या समाजमान्य व्याख्या आणि त्या व्याख्येत स्वत:ला बसवताना होणारी दमछाक.
    —-चौकट—

उपाय काय?

  • ३३ टक्क्यांहून कमी तरुणांची तज्ज्ञांकडून मदत घेण्यास पसंती
  • संगीत ऐकणे, योग, ध्यानधारणा, व्यायाम यामध्ये मन रमवण्यास प्राधान्य
  • समाज माध्यमांच्या वापरात खंड पाडणे किंवा डिजिटल डिटॉक्स करणे


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply