पुणे : नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल परिसरातील घटना.साता-याहून पुण्याला निघालेल्या ट्रकला अपघात; युवकाने जीव वाचविण्यासाठी तलावात मारली उडी

पुणे : साता-याहून पुण्याला निघालेल्या ट्रेलर ट्रकचा अपघात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावर झाला. या अपघातात मदत कार्य करण्यासाठी धावलेल्या युवकाने स्वत:चा जीव जाऊ शकताे अशी शंका निर्माण झाल्याने त्याने दरीपुलावरुन खाली तलावात उडी मारली.

हा अपघात आज पहाटेच्या सुमारास नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल दरम्यान जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ झाला. प्राथमिक माहितीनूसार पहाटे पावणे चार वाजता साताराहून मोठा ट्रेलर ट्रक (एम एच ४६ - २९५०) पुण्याच्या दिशेने येत होता. जांभूळवाडी येथील दरी पुलाजवळ भरधाव ट्रक पलटी झाला.
 
या घटनेची माहिती फायर ब्रिगेडला मिळताच पथक मदतीसाठी घटनास्थळी पाेहचले. ट्रकच्या केबिनमधे जखमी अवस्थेत असलेल्या चालकाला त्यांनी धीर देत. त्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर या उपकरणाच्या मदतीने आणि एका क्रेनच्या साह्याने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यानंतर त्यास तत्काळ उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले.
 
हा अपघात घडताना ताे एक दुचाकीस्वाराने पाहिला. ताे तातडीने मदतीसाठी धावला. परंतु ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेत असल्याचे पाहताच दुचाकीस्वाराने घाबरुन स्वतचा जीव वाचण्याकरिता दरीपुलावरुन खाली तलावात उडी मारली. जवान तेथे दाखल झाल्यानंतर काही वेळाने मदतीसाठी त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास ही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले.

दरम्यान या अपघाताचे नेमके कारण व दोन्ही जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दुर केला आहे.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल शिवाजी मुजूमले, फायरमन शिवाजी आटोळे, मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी तसेच "पीएमआरडीए" अग्निशमन दल यांचे जवान, पोलिस व स्थानिक नागरिकांनी जखमींना मदतीचा हात दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply